नवी मुंबई

कोव्हीड नियमावलीचे उल्लंघन करून वेळेआधीच तिस-या लाटेला आमंत्रण न देण्याचे नागरिकांना आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आजपासून कोव्हीड प्रतिबंधात्मक तिस-या स्तरासाठीची नियमावली लागू करण्यात आली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे विभाग कार्यालय व मुख्यालय स्तरावरून काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश विशेष दक्षता पथकांना देण्यात यावेत असे आदेशित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने वाढ करण्यात येत असलेल्या सर्व आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेत कार्यपूर्ततेसाठी 31 जुलैची डेडलाईन दिली,.

कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीबाबतच्या आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरिष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे उपस्थित होते.

दुसरी लाट काही प्रमाणात ओसरू लागल्याचे निदर्शनास आले तरी महानगरपालिकेने टेस्टींगचे प्रमाण कमी केलेले नाही. सध्या नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट भागांमध्ये टारगेटेड टेस्टींग वाढविण्यात आलेले आहे. डेल्टा प्लस व्हॅरिएंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट क्षेत्रातील टारगेटेड टेस्टींग वाढवून कोव्हीड पॉझिटिव्ह असणारे सर्व रूग्ण शोधून काढणे व त्यांना विलगीकरणात ठेवून त्यांची हालचाल प्रतिबंधित केल्यामुळे कोव्हीडचे पुढचे संक्रमण रोखणे हा उद्देश नजरेसमोर ठेवून टेस्टींग वाढविण्यात आलेले आहे. शनिवारी व रविवारी मॉलमध्येही टेस्टींग केले जात होते. तथापि नव्या तिस-या स्तरातील प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार मॉल बंद झाल्याने येथील टेस्टींग होणार नसून आता मार्केट व बसडेपो याठिकाणी टेस्टींग सुरु करण्यात यावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

नेरुळ व ऐरोली रुग्णालयांतील आयसीयू सुविधा निर्मितीचे कामाचा आढावा घेताना स्थापत्य आणि इलेक्ट्रिकल कामे 31 जुलै हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून अथक काम करून पूर्ण करावीत असे निर्देश अभियांत्रिकी विभागास आयुक्तांनी दिले. याला समांतरच येथील आरोग्यविषयक उपकरणे, यंत्रसामुग्री, औषधे उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी व 31 जुलैपर्यंत तीही पूर्ण करून घ्यावी अशा सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या. या सर्व बाबींची नेमकी कोणत्या टप्प्यातील कार्यवाही सुरू आहे याचा सुविधानिहाय आढावा आयुक्तांनी बारकाईने घेतला.

दुस-या लाटेमधील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेऊन ऑक्सिजनच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्याकरिता नियोजन करण्यात आले असून 5 पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर प्लान्टपैकी एका प्लान्टचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चारही ऑक्सिजन प्लान्टची कामे 31 जुलैपर्यंत पूर्ण होतील याकडे लक्ष ठेवून प्लान्ट उभारणीची कार्यवाही विहित वेळेत करावी व सीएसआर निधीतून उपलब्ध होणा-या एका प्लान्टचीही कार्यवाही जलद सुरु करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. या सोबतीनेच ऑक्सिजन स्टोरेजचे 2 प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्याचेही सूचीत करण्यात आले. यासोबतच ड्युरा सिलेंडर वाढ करण्याबाबत गतीमान कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या.

कोव्हीड विषयक आरोग्य सुविधांमध्ये वाढ करतानाच नॉन कोव्हीड आरोग्य सुविधांच्या पूर्ततेकडे विशेषत्वाने प्रसूतीविषयक बाबींकडे लक्ष देत वाशी, तुर्भे व बेलापूर रुग्णालयातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्याच्या कामांचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच त्या प्रमाणात रुग्णवाहिकांचीही वाढ करण्याच्या दृष्टीने 2 दिवसात आराखडा सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

तिस-या लाटेविषयी जागतिक सद्यस्थितीचा आढावा घेऊन व नामांकित आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलेली अभ्यासपूर्ण निरीक्षणे व मते विचारात घेऊन कोव्हीडच्या तिस-या लाटेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आवश्यक उपाययोजना करीत आहे. तथापि तिस-या लाटेला जेवढा विलंब करता येईल तेवढी त्यापासून होणारी हानी कमी होईल हे लक्षात घेत नागरिकांनी कोव्हीड अनुरूप योग्य वर्तन ठेवत सुरक्षा त्रिसूत्रीचे पालन करून तसेच लसीकरण करून घेऊन तिसरी लाट लांबविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button