नियमित लोकसंपर्क असणा-या कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन, मेडिकल स्टोअर्समधील कर्मचा-यांपासून सुरूवात – 250 औषध विक्रेत्यांचे लसीकरण
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना घरापासून जवळच कोव्हीड लस घेता यावी याकरिता लसीकरण केंद्र संख्येत सातत्याने वाढ करण्यात आली असून सध्या 78 केंद्रे कार्यान्वित आहेत व लस उपलब्धतेनुसार त्यामध्ये आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने जागांची निवड करून ठेवत संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. त्यासोबतच लसीकरणापासून कोणताही घटक वंचित राहू नये याची काळजी घेत 18 वर्षावरील कॉरी क्षेत्रात राहणारे कामगार तसेच बेघर निराधार व्यक्तींचेही लसीकरण करण्यात येत आहे.
तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेता 31 जुलैपर्यंत 45 वर्षावरील नागरिकांना लसीचा किमान पहिला डोस देऊन संरक्षित करण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती तसेच आशा स्वयंसेविकांना प्रतिव्यक्ती 10 रूपये विशेष भत्ता देत लसीकरणाचा वेग वाढविला जात आहे.
अशाप्रकारे विविध घटकांच्या लसीकरणाकडे लक्ष दिले जात असताना ज्या व्यक्तींचा सेवा पुरविताना अनेक व्यक्तींशी नियमित संपर्क येतो अशा कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींसाठी (Potential Superspreaders) महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष लक्ष दिले जात आहे.
आरोग्य साखळीतील मेडिकल स्टोअर्स हा एक महत्वाचा घटक आहे. तेथील कर्मचा-यांचा नागरिकांशी व त्यातही आजारी असलेल्या नागरिकांशी नियमित संपर्क येतो. त्यामुळे त्यांना कोव्हीड लसीचे संरक्षण मिळावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सानपाडा येथील केमिस्ट भवनमध्ये औषध विक्रेत्यांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रामध्ये मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणा-या 169 पुरूष व 81 महिला अशा एकूण 250 औषध विक्रेत्या कर्मचा-यांचे लसीकरण करण्यात आले.
आमच्या कोव्हीड काळातील कामाची दखल घेऊन विशेष लसीकरण सत्र आयोजित केल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांतून आलेल्या मेडिकल स्टोअर्स कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले. या सत्रात जे लसीकरणासाठी येऊ शकले नाहीत अशा औषध विक्रेत्यांसाठी आणखी एकवार सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
कोव्हीड विरोधातील लढाईत मेडिकल स्टोअर्समधील कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेत काम केले आहे व करीत आहेत. त्यांच्याकडे औषधे खरेदीसाठी येणा-या व्यक्ती विविध स्वरूपाच्या असतात. त्यामुळे असे जोखमीचे काम करणा-या घटकांना कोव्हीड लसीव्दारे संरक्षित करणे महत्वाचे असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्याकरिता हे विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यापुढील काळात अशाचप्रकारे हॉटेल/रेस्टॉरंट मध्ये काम करणारे कर्मचारी, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, स्विगी/झोमॅटो/कुरिअर सेवांमधील कर्मचारी, मार्केटमधील विक्रेते, घरोघरी दूध आदी सेवा पुरविणा-या व्यक्ती, टॅक्सी/रिक्षा चालक, सभागृहांमध्ये सेवाकार्य करणारे कर्मचारी अशाप्रकारे जनतेशी मोठ्या प्रमाणात संपर्क येणा-या व्यक्तींसाठीही महानगरपालिकेच्या वतीने विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येतील असे सूचित केले आहे.