एफ.जी. नाईक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन:
कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाचे एफ.जी. नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिट तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सौ. स्मिता जेम्स, संचालक स्मित फाउंडेशन, निसर्गोपचार तज्ञ आणि योगा प्रशिक्षक यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या आयुष्यात योगाचे महत्त्व विषद केले. आज संपूर्ण जग योगाकडे एक सुदृढ व निरोगी जीवनशैली तसेच भारताची संस्कृती म्हणून पाहत असताना आपण भारतीयांनी देखील आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा. त्याचप्रमाणे योग आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवावा ज्यामुळे आपण व्यक्तिगतच नव्हे तर आपले राष्ट्र देखील आरोग्यदृष्ट्या सदृढ व कायर्यक्षम होईल.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनात योगाच्या विविध आसनांचे महत्त्व व त्यांचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम सांगितले. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिके करून दर्शविले. मुलांनीही यात सहभाग घेऊन विविध प्रात्यक्षिके करून दाखवले. योगसाधनेमुळे केवळ अध्यात्मिकच नाहीत तर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्राप्त होण्यास मदत होते सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. प्रताप महाडिक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये योग दिनाचे महत्त्व व 21 जून या दिवसाचे महत्त्व विशद केले या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. जयश्री दहाट व प्रा.अतुल घाडगे तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी समितीचे प्रमुख प्रा. सौ. प्राजक्ता पाटील व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपस्थिती दर्शवून प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. जयश्री दहाट यांनी केले असून या कार्यक्रमाचे आभार प्रा. सौ. प्राजक्ता पाटील यांनी व्यक्त केले.