पहिल्याच दिवशी 30 ते 44 वयोगटातील 6058 नागरिकांनी घेतली लस:
– पहिल्याच दिवशी 30 ते 44 वयोगटातील 6058 नागरिकांनी कोव्हीड लस घेत दिला उत्साही प्रतिसाद
शासन निर्देशानुसार आज 19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या कोव्हीड लसीकरणाला सुरूवात करण्यात आलेली असून आज पहिल्याच दिवशी 30 वर्षावरील नागरिकांनी महानगरपालिकेच्या सर्वच भागातील लसीकरण केंद्रांवर उत्साहाने उपस्थित राहून लसीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला. 30 ते 44 वयोगटातील 6058 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी आधीच्या 37 लसीकरण केंद्रांमध्ये 17 जूनपासून आणखी 22 लसीकरण केंद्रांची भर टाकण्यात आलेली आहे. आजपासून नव्याने समाविष्ट झालेल्या 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी 23 नागरी आरोग्य केंद्रे, 4 रूग्णालये, ईएसआयएस रूग्णालयातील जम्बो सेंटर तसेच 2 मॉलमधील ड्राईव्ह इन केंद्रे अशा 30 ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. याठिकाणी पहिल्याच दिवशी 30 ते 44 वयोगटातील 6058 नागरिकांनी लसीकरण करून घेतले.
नवी मुंबई महानगरपालिका लसींच्या उपलब्धतेनुसार नागरिकांना सोयीचे ठरेल अशाप्रकारे केंद्र संख्येत वाढ करीत लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग देत आहे. दररोज संध्याकाळी दुस-या दिवशी कोणत्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे हे त्याठिकाणी उपलब्ध असणा-या डोसच्या संख्येसह विविध माध्यमांतून प्रसिध्द करीत असून नागरिकांच्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. तरी 30 वर्षावरील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता जाहीर करण्यात येणा-या लसीकरण केंद्रांच्या यादीवरील आपल्या जवळच्या केंद्रांवर थेट जाऊन कोव्हीडपासून संरक्षण देणा-या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.