22 नवीन केंद्रांमध्ये पहिल्याच दिवशी 45 वर्षावरील 561 नागरिकांचे लसीकरण
सध्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ लस घेता यावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध भागांमध्ये नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. अशाच प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या 22 शाळांमध्ये आजपासून नवीन लसीकरण केंद्रे कार्यान्वित झाली असून आज पहिल्याच दिवशी या 22 लसीकरण केंद्रांवर 45 वर्षावरील 561 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
संभाव्या तिस-या लाटेपूर्वी 45 वर्षावरील नागरिकांचा किमान एक डोस दिला जावा याकरिता महानगरपालिका लसीकरणाला गती देण्याचा विविध माध्यमांतून प्रयत्न करीत असून नागरिकांना सहजपणे लस उपलब्ध व्हावी याकरिता आधीच्या 34 लसीकरण केंद्रांमध्ये 22 नवीन केंद्रांची वाढही करण्यात आलेली आहे. तसेच लसीच्या उपलब्धतेनुसार आणखी लसीकरण केंद्रांचे वाढ करण्याचे नियोजन आहे.
तरी 45 वर्षांवरील नवी मुंबईकर नागरिकांनी आरोग्य जपणुकीच्या दृष्टीने कोव्हीड लसीकरणाचे महत्व लक्षात घेऊन संपूर्णत: सुरक्षित असलेल्या कोव्हीड लसीचा डोस आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन घ्यावा व स्वत:ला संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.