मॉलमध्ये शनिवारी व रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच दिला जाणार प्रवेश, आज पहिल्या दिवशी 4 वाजेपर्यंत 2212 नागरिकांची अँटिजेन टेस्टींग
कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवित असताना प्रतिबंधाचे स्तरानुसार वर्गीकरण असलेल्या ब्रेक द चेन विषयक दि. 5 जून 2021 रोजीच्या सुधारित शासन आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही आदेश निर्गमित करण्यात आलेले असून त्यामध्ये अधिक स्पष्टता येण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दि. 8 जून रोजी सुधारित आदेश निर्गमित केलेले आहेत.
त्यानुसार शहरातील सर्व मॉल्स आठवड्याचे सातही दिवस 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वा. च्या मर्यादेत सुरू राहणार आहेत. यामध्ये मॉल्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहणे अपेक्षित असल्याने 50 टक्के क्षमता सुनिश्चित करण्यासाठी मॉलमधील सर्व दुकाने एकाच दिवशी सुरू न ठेवता दररोज फक्त 50 टक्के दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. म्हणजेच मॉलमधील पहिल्या दुकानापासून एक दुकान आज व त्या शेजारील दुसरे दुकान उद्या अशाप्रकारे आळीपाळीने सुरू ठेवणे अनुज्ञेय आहे. याचाच अर्थ कोणत्याही सलग दोन दुकानांपैकी एक दुकान आज तर त्या शेजारील दुसरे दुकान उद्य अशा पध्दतीने दुकाने सुरू ठेवणे अनुज्ञेय आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी व रविवारी मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अभ्यागतांची रॅपीड अँटिजेन टेस्ट केल्यानंतरच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील चारही मोठ्या मॉलमध्ये ठेवलेल्या अँटिजेन टेस्टींग कॅम्पमध्ये सायं. 4 वाजेपर्यंतच्या सत्रात 2212 नागरिकांची अँटिजेन टेस्टींग करण्यात आलेली आहे. त्यामध्ये रघुलीला मॉलच्या 2 प्रवेशव्दारांवर 291, सेंटर वन मॉलच्या प्रवेशव्दारावर 44, ग्रँड सेंट्रल मॉलच्या 4 प्रवेशव्दारांवर 1089 तसेच इनॉर्बिट मॉलच्या 3 प्रवेशाठिकाणी 788 अभ्यागतांची अँटिजेन टेस्ट करण्यात आलेली आहे.
ब्रेक द चेनच्या नियमात प्रतिबंधाचा स्तर ठरवून देण्यात आलेला असून नवी मुंबई महानगरपालिका दुस-या स्तरात आहे. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दैनंदिन व्यवहारात सवलती देण्यात आलेल्या आहेत. तथापि नागरिकांनी कोव्हीड अजून संपलेला नाही याचे भान राखून मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे या कोव्हीडपासून बचावाच्या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.