नवी मुंबई

बालकांच्या संरक्षणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा विनामूल्य नियमित लसीकरण कार्यक्रम

लसीकरणाव्दारे अनेक आजारांना प्रतिबंध करण्यात येतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नवी मुंबई महागरपालिका कार्यक्षेत्रात बालकांमधील लसीकरणाव्दारे प्रतिबंध करता येणाऱ्या आजारांचे प्रमाण व त्या आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने ‘सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम’ सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत गर्भवती माता, नवजात बालके, दोन वर्षा आतील बालके, 5,10 व 16 वर्षांची मुले / मुली यांना लसीकरण करण्यात येत आहे.

ज्या आजारांवर लस उपलब्ध आहे त्या आजारांवरील लसीकरण करुन बालकांमधील आजाराचे व त्यामुळे होणारी आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हे लसीकरण लाभादायक ठरणार आहे. यामध्ये – लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येणाऱ्या आजारांसाठी लहान बालकांचे तसेच गरोदर मातांचे लसीकरण नियोजित सत्रांमध्ये करण्यात येत आहे. लसीची क्षमता टिकविण्यासाठी शीत साखळीचे व्यवस्थापन काटेकोरपणे पाळण्यात येत असून प्रत्येक लसीकरीता / इंजेक्शनकरीता स्वतंत्र सुईचा वापर केला जात आहे तसेच जैविक वैद्यकीय कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावली जात आहे. लसीकरण योग्य रितीने व्हावे याकरिता वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे नियमित प्रशिक्षण / पुनर्प्रशिक्षण केले जात आहे.

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व लसींचा पुरवठा शासनामार्फत मोफत करण्यात येतो. यासाठी शासनाने दिलेल्या उपकरणांव्दारे शीतसाखळी अबाधित ठेवण्यात येते. हा लस साठा नवी मुंबईमहानगरपालिका रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 27 कोल्ड चेन पॉइंटच्या ठिकाणी साठवणूक करण्यात येते.

23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात शाळा, अंगणवाडी, खाजगी दवाखाने, सोसायटी ऑफिस अशा विविध ठिकाणी बाह्यलसीकरण सत्र आयोजित करण्यात येते. तसेच 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व महानगरपालिका रुग्णालये याठिकाणी स्थायी लसीकरण सत्र घेण्यात येते. याशिवाय दगडखाणी, बांधकामे, विरळ झोपडपट्या अशा ठिकाणीही मोबाईल सत्रे आयोजित करण्यात येतात. महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक महिन्याला 301 बाह्य संपर्क सत्रे, 139 स्थायी सत्रे व 30 मोबाईल सत्रे अशा एकूण 469 सत्रांव्दारे लसीकरण करण्यात येते. या सत्रांच्या संख्येमध्ये आवश्यकतेनुसार व मागणीनुसार वेळोवेळी वाढ करण्यात येते. ही सत्रे दरमहा ठराविक दिवशी आयोजित करण्यात येतात. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व लसी मोफत देण्यात येतात.

लसीकरण सत्राचे वेळापत्रक : लाभार्थ्यांने प्रत्येक वेळी घ्यावयाच्या विविध लसी व लस देण्याची जागा दर्शविणारा तक्ता पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र. लस लस कधी द्यावी

1 टी.डी. -1 गरोदरपणाच्या सुरुवातीला

2 टी.डी. -२ टी.डी. 1 दिल्यानंतर ४ आठवडयांनी

3 टी.डी.- बूस्टर जर माता मागील टी.डी. दिल्यानंतर ३ वर्षाच्या आत गरोदर राहिल्यास

4 बी.सी.जी. जन्मतः, शक्य तितक्या लवकर, एक वर्ष पूर्ण होण्या आधी

5 हिपॅटायटिस़-बी जन्मतः जन्मल्यानंतर २४ तासाच्या आत

6 .पी.व्ही. झिरोमात्रा जन्मतः, शक्य तितक्या लवकर, १४ दिवसापर्यंत

7 ओ.पी.व्ही. १,२ व ३ जन्मल्यानंतर ६, १० व १४ वा आठवडा पूर्ण झाल्यावर

8 पेंटाव्हॅलंट १,२ व ३ जन्मल्यानंतर ६, १० व १४ वा आठवडा पूर्ण झाल्यावर

9 गोवर रुबेला जन्मल्यानंतर ९ महिने पूर्ण झाल्यावर, १ वर्ष पूर्ण होण्याआधी

10 जीवनसत्व- अ- १ जन्मल्यानंतर ९ महिने पूर्ण झाल्यावर, गोवर लसी बरोबर

11 डी.पी.टी. बूस्टर १६ ते २४ महिने

12 ओ.पी.व्‍ही. बूस्टर १६ ते २४ महिने

13 गोवर रुबेला बूस्टर १६ ते २४ महिने

14 जीवनसत्व- अ- २ ते ९ १६ महिने व नंतर प्रत्येक सहा-सहा महिन्याने ५ वर्षे पूर्ण होईपर्यंत

15 डी.पी.टी. बूस्टर ५ ते ६ वर्षे

16 टी.डी. १० व १६ वर्षे

कोव्हीड 19 बाबत तिसरी लाट येण्याचा संभव असल्याचे जागतिक आरोग्य तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे तसेच या लाटेमध्ये लहान बालकांना संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे अशी शक्यता वर्तविली जात आहे. कोव्हीड 19 आजारामध्ये श्वसनसंस्था तसेच फुफ्फुसे न्युमोनियाने बाधित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत 9 महिने पूर्ण झालेल्या बालकाला गोवर रुबेला लसीचा पहिला डोस तसेच 16 महिने पूर्ण झालेल्या बालकाला गोवर रुबेला लसीचा दुसरा डोस देण्यात येतो. गोवर रुबेला लसीमुळे न्युमोनिया व त्यामुळे होणारी गुंतागुंत / मृत्यू यापासून बालकाचा बचाव होतो. त्याचप्रमाणे बालकांना इन्फ्युएन्झा लस देण्याचे नियोजन करण्यात येत असून महापालिका क्षेत्रात इन्फ्युएन्झा करिता सार्वत्रिक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

तरी कोव्हीड 19 ची संभाव्य तिसरी लाट विचारात घेता गोवरच्या बालकांच्या प्रकृतीत गुंतागुत होणाऱ्या न्युमोनियापासून संरक्षण होण्यासाठी पालकांनी आपल्या दोन वर्षांपर्यंतच्या बालकाला वयानुसार पहिला आणि दुसरा डोस देऊन सुरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button