सन 2021-22 आर.टी.ई. ॲक्ट 2009 अंतर्गत आरक्षित 25 टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) नुसार सन 2021-22 शैक्षणिक वर्षाकरीता अल्पसंख्यांक शाळा वगळून मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांमध्ये वंचित गटातील व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्गात 25% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.
सन 2021-22 करिता आर. टी. ई. 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत राज्य स्तरावरुन दि. 07 एप्रिल 2021 रोजी लॉटरी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सन 2021-22 आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया दि. 11 जून 2021 पासून सुरु होत असून ज्या बालकांची निवड झाली आहे, त्या बालकाच्या पालकांनी ज्या शाळेत निवड झाली आहे, त्या शाळेत जाऊन दिनांक 30 जून 2021 पर्यंत बालकाचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे.
निवड झालेल्या बालकांच्या पालकांना मोबाईलवर एस.एम. एस. व्दारे तात्पुरत्या प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल. परंतू पालकांनी फक्त एस.एम.एस. वर अवलंबून न राहता आर.टी.ई. पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पहावयाचा आहे.
शाळेत प्रवेशाकरिता पालकांनी प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित दोन प्रती तसेच आर.टी.ई. पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करुन हमीपत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter) ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे असे सूचित करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करु नये व सर्व शासकीय नियमांचे पालन करुन प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्याबरोबर नेऊ नये. प्रतीक्षा यादीतील (waiting list) बालकांच्या पालकांनी सध्या शाळेत जाऊ नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.