जनतेने केंद्रपुरस्कृत योजनेचा लाभ घ्यावा : तहसीलदार विजय तळेकर
पनवेल : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाखाली राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वयोगटातील कर्ता स्त्री किंवा पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक रकमी रूपये 20,000/- (वीस हजार ) रुपये शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते.
या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील 1) गुलाब चांगा कातकरी रा. चेरवली 2) सरोजा अंकुश माने रा.वावेघर 3) कल्पना गणपत वाघमारे रा. तक्का-पनवेल 4) बामी विष्णू दोरे रा. मालडुंगे 5) मंगला यशवंत वाघे रा. नेरे पाडा यांना प्रत्येकी रु.20,000/-(वीस हजार प्रमाणे अशी एकूण 100,000/-(एक लाख) रुपयांची मदत पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते देण्यात आली. संबंधीत लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप तहसीलदार कार्यालयात करण्यात आले.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्ता स्त्री किंवा पुरूष मरण पावल्यास यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ता स्त्री किंवा पुरुष हा मयत झालेल्या दिवसापासून ते 1 वर्षाच्या आत तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करणे आवश्यक होते. त्यात सुधारणा करून आता शासनाने ही मुदत मयत दिनांकापासून तीन वर्षापर्यंत वाढवलेली आहे. अशा लाभार्थ्यांनी कुटुंबातील कर्त्या स्त्री-पुरुषाचे निधन झाल्यास आणि ती व्यक्ती दारीद्रय रेषेखालील असल्यास विहीत नमुन्यातील फॉर्म भरून या केंद्रपुरस्कृत योजनेचा लाभ पनवेल तालुक्यातील जनतेने घेण्याचे आवाहन तहसीलदार विजय तळेकर केले आहे.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार एकनाथ वि. नाईक, निवासी नायब तहसीलदार संजिव मांडे, संगायो शाखेतील कर्मचारी व लाभ देण्यात आलेल्या व्यक्तीचे गावातील संबधीत तलाठी उपस्थित होते.