पर्यावरणप्रेमी रिक्षाचालक उमर खान यांचे आयुक्तांकडून विशेष कौतुक आणि सन्मान
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयकॉनिक इमारत म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या आवारात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. याप्रसंगी पर्यावरणप्रेमी रिक्षाचालक उमर खान यांचे आयुक्तांकडून विशेष कौतुक आणि सन्मान करण्यात आला.
आपल्या रिक्षामध्ये फुलझाडांच्या कुंड्या लावून तसेच रिक्षाच्या छतासह इतर भाग हिरवागार करणारे व अंतर्गत भागातही हिरवळ राखणारे रिक्षाचालक उमर खान यांनी स्वयंस्फुर्तीने जपलेल्या वृक्षप्रेमाचे आयुक्तांनी कौतुक केले. करावेगांवात राहणारे उमर खान मागील 4 वर्षापासून रिक्षा चालवित असून 2 वर्षांपासून त्यांनी आपल्या रिक्षाला हरित स्वरूप दिले आहे.
अशा प्रकारचे पर्यावरणप्रेम प्रत्येकाने अनुकरण करण्यासारखे आहे असे सांगत आयुक्तांनी फुलझाडाची कुंडी प्रदान करून त्यांचा विशेष सन्मान केला. यावेळी उमर खान यांच्याही हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या विनंतीनुसार आयुक्तांनी हरित रिक्षात वृक्षारोपण स्थळापासून महापालिका प्रवेशव्दारापर्यंत सफरही केली.