दिव्यांग, निराधार, व्याधीग्रस्त महिलांकरिता प्रेमदान आश्रमातच विशेष कोव्हीड लसीकरण सत्र
सेक्टर 17 ऐरोली येथील प्रेमदान आश्रमात असलेल्या निराधार, वयोवृध्द व विविध व्याधींनी ग्रस्त महिलांना आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लसीकरण सत्र आयोजित करीत कोव्हीड लसीकरण करण्यात आले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित या लसीकरण सत्राचा लाभ आश्रमातील 109 महिलांनी घेतला.
कोव्हीडच्या पहिल्या लाटेत येथील 2 महिलांना तापाची लक्षणे जाणवल्याने त्याठिकाणी विशेष कोव्हीड तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 100 हून अधिक महिला कोव्हीड पॉझिटिव्ह आढळून आल्याने या सर्व महिलांची मनोवस्था व शारीरिक अपंगत्वाची स्थिती तसेच बहुतांशी महिलांचे 60 पुढील वय आणि त्यांना असलेल्या विविध प्रकारच्या सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) ही स्थिती आव्हानात्मक होती. या सर्व बाबींचा विचार करून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार आश्रमालाच कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषीत करीत या महिलांची विशेष काळजी घेण्यात आली. महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने या निराधार, दिव्यांग, व्याधीग्रस्त तसेच मोठ्या प्रमाणात वयाने ज्येष्ठ असलेल्या महिलांची सेवा करताना आरोग्य सेवेसोबतच मानवतावादी दृष्टिकोन ठेवला आणि अतिशय समर्पित वृत्तीने काम केले.
हिच भावना कायम राखत आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या महिलांकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले. यामधील प्रत्येक लाभार्थी महिलेची सरकारच्या कोवीन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली व लसीकरण करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून येथील निराधार, वयोवृध्द, मतिमंद तसेच विविध व्याधींनी त्रस्त महिलांचा विचार करून आयोजित केलेल्या या विशेष लसीकरण सत्राबद्दल संस्थेमार्फत समाधान व्यक्त करण्यात आले.