कोरोना योध्यांना समर्पित “सूरताल कराओके सिंगिंग स्टार २०२१” स्पर्धा संपन्न!
‘गामा फाऊंडेशन’ आयोजित “सूरताल कराओके सिंगिंग स्टार २०२१” या हिंदी गीतांच्या ‘कराओके गायन स्पर्धेची अंतिम फेरी काल फेसबूकच्या माध्यमातून संपन्न झाली. हौशी स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम विशेष रंगला होता. जगभरातील संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून आस्वाद घेतला.
गेल्या दोन वर्षात कोरोनाने जगभरासह आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात घातलेला थैमान आणि त्याला धीराने सामोरी जाणारी आपली जनता. तसेच कोरोनाला हरवून लावण्यासाठी अहोरात्र लढणारे आपले कोरोना योध्ये. या महामारीसोबत लढणाऱ्या कोरोना योध्यांना ही स्पर्धा समर्पित करण्यात आली होती. सध्याच्या कठीण काळात आपल्यातील अनेक गुणी हौशी कलावंतांच्या गायन छंदाला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावा हाही प्रमुख हेतू ही स्पर्धा आयोजित करण्यामागे होता. स्री आणि पुरुष वय वर्ष १८ ते ४५ आणि ४६ ते ८० असे दोन गट करण्यात आले होते. तसेच स्पर्धकांकडून विनामूल्य प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. ८ मे रोजी ही स्पर्धा जाहीर केल्यावर २२ मे पर्यंत जवळ जवळ २५० च्या वर प्रवेशिका आल्या. त्यातील १२ स्पर्धक ‘गामा फाऊंडेशन’ कडून शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.
दोन तास सुरु असलेल्या कार्यक्रमात स्पर्धांकचा उत्साह खूपच चांगला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ‘एबीपी माझा’ चे न्यूज अँकर अश्विन बापट यांनी स्पर्धेचे नियम स्पर्धांकना अधोरेखित करून दिले आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम कार्यक्रमाचे परीक्षक आणि ख्यातनाम संगीत संयोजक प्रशांत लळित आणि ख्यातनाम गायिका विद्या करलगीकर यांची ओळख आणि स्वागत केल्यावर स्री शक्तीला वंदन करून, स्री स्पर्धांकांपासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. परीक्षकांनी सुचवलेल्या गाण्यावर स्पर्धकांनी गाणे गाण्यास सुरुवात केली. हळू हळू गाण्याची स्पर्धेतील चुरस खूपच वाढत गेली. स्पर्धा फेसबुकवर लाईव्ह असल्यामुळे ती प्रत्यक्ष पाहणाऱ्या रसिकांचा व्हिडीओवर कॉमेंट्सचा वर्षाव होत होता.
फ्रंटलाईन कोरोना योद्धा असलेले डॉ. राहुल जोशी (एम.डी.होमिओपथी) कार्यक्रमाच्या मध्यान्याहत सहभागी झाले. डॉक्टरांनी त्यांचे कोरोना कार्यकाळ आणि एकूण त्यांच्या कार्यकाळातील काही गोष्टींचा अनुभव कथन केला. तसेच त्यांनी ‘संत कबीरा’चा दोहा गाऊन गाण्यातून आपण आपलं काम करत राहावं असा संदेश दिला. ह्या स्पर्धेच्या परीक्षक प्रसिद्ध गायिका विद्या करलगीकर यांनी या स्पर्धेचे परीक्षणासोबतच स्पर्धकांना बहुमूल्य मार्गदर्शनही केले. तर विशेष अतिथी प्रमोद कुलकर्णी यांनीही स्पर्धकांच्या गायनकौशल्याचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली. पुरुष आणि महिलांमध्ये २ गटात एकूण ४ बक्षिसे देण्यात आली. प्रत्येकी १०००/- आणि विद्या कारलगीकर यांच्या आग्रहात्सव एक उत्तेजनार्थ बक्षीस म्हणजेच एक हजार रुपयाचा चेक कार्यक्रमाचे विशेष पाहुणे ‘कुलकर्णी ऑप्टीशन्स’चे प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. विजेत्यांना बक्षिसरुपी धनादेश व प्रमाणपत्र त्यांच्या निवासी पत्त्यावर पोहच करण्यात आले आहे.
विजेत्यांमध्ये १८ ते ४५ पुरुष आणि महिला गटातील अनुक्रमे शरद जगताप आणि स्नेहा कांबळे, दुसऱ्या ४६ ते ८० या पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे मिलिंद कुलकर्णी आणि रश्मी लुकतुके त्याचबरोबर एक उत्तेजनार्थ गटातील स्मिता चंदावरकर यांची निवड करण्यात आली.