मुलांवरील उपचारांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा उभारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेचा प्रभाव मुलांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्वतयारी सुरु केलेली असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यापूर्वीच 9 मे रोजी नवी मुंबईतील बालरोग तज्ज्ञांशी वेबसंवाद साधला होता. याबाबतच्या नियोजनाला कृतिशील स्वरुप देण्यासाठी आयुक्तांनी रविवारी 30 मे रोजी विशेष बैठक आयोजित करीत महाराष्ट्र शासनाच्या बालरोगतज्ज्ञ कोव्हीड टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य आणि नवी मुंबईतील नामवंत बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय येवले तसेच अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, नवी मुंबईचे शाखा अध्यक्ष डॉ. जितेंद्र गव्हाणे, सचिव डॉ. सतिश शहाणे, खजिनदार डॉ. मेधाई सिन्हा, नवी मुंबई महानगरपालिका बालरोगतज्ज्ञ फोर्सचे सदस्य डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ़. धनवंती घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, बालरोगतज्ज्ञ डॉ. उध्दव खिल्लारे व डॉ. माधवी इंगळे उपस्थित होते.
कोव्हीडच्या तिस-या लाटेची चर्चा सुरु झाल्यानंतर मुलांच्या आरोग्याविषयी अधिक जागरुकता बाळगण्याची गरज वर्तविण्यात येऊ लागली. पालकांना आपल्या मुलांबाबत अधिक काळजी वाटत असल्याने हा मुद्दा अत्यंत महत्वाचा झाला. याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजनास सुरुवात केलेली असून मुलांसाठी कोव्हीड सेंटरमध्ये स्वतंत्र कक्ष तसेच आवश्यकतेनुसार त्याठिकाणी बालकांसाठी पूरक व्हेन्टिलेटर्सची व्यवस्था करण्याची तयारी सुरु करण्यात आलेली आहे.
या बैठकीत डॉ. विजय येवले यांनी नवी मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता संभाव्य तिस-या लाटेत कोणत्या स्वरुपाचे किती बेड्स आवश्यक आहेत, त्यासाठी किती मनुष्यबळ गरजेचे आहे तसेच कोणत्या स्वरुपाचा औषध साठा उपलब्ध करून ठेवायचा आहे याविषयी सादरीकरणाव्दारे माहिती दिली. बालकांसाठी सुविधा निर्माण करताना कोव्हीडबाधीत, नॉन कोव्हीड व नवजात बालके अशा तीन स्वरुपाच्या सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करावा लागेल असे मत मांडण्यात आले. त्याचप्रमाणे बालकांसाठी आवश्यक विशिष्ट प्रकारच्या टेस्ट्सची व्यवस्था करावी लागेल असेही सूचित करण्यात आले. एकूण बेड्समध्ये 50 टक्के ऑक्सिजन बेड्स व 15 टक्के बालकांसाठी पूरक आयसीयू बेड्स व व्हेन्टिलेटर्स व्यवस्था असावी अशी सूचना करण्यात आली. या सर्व सूचनांबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवित वर्तविलेल्या अपेक्षेपेक्षा अधिकचे नियोजन करण्यात येईल असे आश्वासित केले.
कोव्हीड सेंटरमध्ये मुले उपचारार्थ दाखल झाल्यानंतर त्यांच्या सोबत काळजी घेण्यासाठी असलेल्या आई अथवा वडील यांचीही काळजी घेण्याची गरज लक्षात घेऊन तशाप्रकारची सुविधा निर्माण करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुलांसोबत असलेल्या केअर टेकर यांच्यासाठी एसओपी बनविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. मुलांसाठी कोव्हीड सुविधा केंद्रे बनविताना नॉन कोव्हीड मुलांसाठीही उपचार केंद्रे असावीत या बालरोगतज्ज्ञांच्या सुचनेच्या अनुषंगाने आयुक्तांनी तशाप्रकारची सुविधा निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाला नियोजन करण्याचे निर्देश दिले.
कोव्हीडबाधीत बालकांवर उपचार करण्यासाठी तशाप्रकारची प्रशिक्षित डॉक्टर व नर्सेसची गरज लक्षात घेऊन अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, नवी मुंबई शाखेच्या वतीने महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या डॉक्टर व नर्सेसचे प्रक्षिक्षण घेण्याबाबत उपस्थित बालरोगतज्ज्ञांनी सहमती दर्शविली. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये दाखल कोव्हीडबाधीत बालकांच्या उपचारांसाठी गरज भासेल तेव्हा नवी मुंबईतील बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असतील अशाप्रकारचा विश्वासही आयुक्तांकडे व्यक्त करण्यात आला.
या सर्व उपाययोजना करताना नागरिक बरे वाटत नाही असे जाणवल्यावर ज्यांच्याकडे सर्वप्रथम जातात असे खाजगी डॉक्टर्स तसेच शहरातील बालरोगतज्ज्ञ यांची भूमिका महत्वाची असून त्यांच्यामध्ये या विषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याबाबत नियोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचणा-या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचीही या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले.
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेत बालकांचे प्रमाण अधिक असेल अशा चर्चांमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण असून पालकांनी घाबरून न जाता आपल्या मुलांमध्ये तशा प्रकारची लक्षणे जाणवल्यास लपवून न ठेवता त्वरीत कोव्हीड टेस्ट करून घ्यावी व योग्य उपचार घ्यावेत असे आवाहन बालरोगतज्ज्ञांच्या वतीने करण्यात आले व याबाबतची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक विभागातील खाजगी डॉक्टरांकडे याबाबतचे माहितीपत्रक नागरिकांसाठी उपलब्ध करून ठेवावे व प्रसारमाध्यमांतूनही त्यास प्रसिध्दी द्यावी असे सूचित करण्यात आले.
याशिवाय सध्या कोरोनातून बरे झालेल्या मुलांमध्ये एमआयएस – सी आजाराची लक्षणे आढळत असून यावरही चर्चा करण्यात आली. जास्त प्रमाणात ताप, उलट्या, जुलाब, डोळे लाल होणे, ओठ – जीभ – घसा लाल होणे अशी लक्षणे मुलांमध्ये आढळल्यास विनाविलंब डॉक्टरांकडे जावे याबाबत पालकांमध्ये जागृती करावी असे बालरोगतज्ज्ञांनी सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिका मुलांना कोव्हीडची लागण होऊ नये याकरिता दक्ष असून कोव्हीडची बाधा झालीच तर आरोग्य सुविधा वाढीप्रमाणेच कोव्हीड प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी तत्पर आहे. याबाबत बालरोगतज्ज्ञांनी सूचविलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करणार असल्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.