नवी मुंबई

मालमत्ता कर वसुलीचा कृती आराखडा तयार करून गती देण्याचे आयुक्तांचे आदेश

कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेची पूर्व तयारी सुरु असताना आवश्यक सुविधा उपलब्धतेवर भर दिला जात आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे हे लक्षात घेत मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत असल्याने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर विभागाची विशेष बैठक घेत कर वसूलीवर भर देण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी मालमत्ता कर विभागाच्या प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले आणि विभागतील सर्व अधिकारी उपस्थित होते.

या आर्थिक वर्षात 700 कोटी रक्कमेचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून कृती आराखडा करण्यात यावा व त्याच्या पूर्ततेसाठी कालबध्द नियोजन करण्यात यावे असे आयुक्तांनी सूचित केले. अभय योजना जाहीर करून व त्यास मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न देणा-या मालमत्ता धारकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात यावे व त्यानंतरही प्रतिसाद न दिल्यास नोटीस बजाविण्यात यावी आणि आवश्यकता भासल्यास बँक खाते गोठविणे अथवा मालमत्ता जप्तीची वा लिलावाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले.

एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीची देयके 5 जून पर्यंत 100 टक्के वितरीत होतील याची दक्षता घ्यावी असे सूचित करतानाच नियमित मालमत्ता कराप्रमाणेच थकबाकी वसूलीकडेही काटेकोर लक्ष देण्याचे आयु्क्तांकडून निर्देशित करण्यात आले.

एप्रिल व मे महिन्यात कोव्हीडच्या प्रभावामुळे आरोग्यासह महानगरपालिकेच्या इतरही विभागांचे अधिकारी, कर्मचारी कोव्हीड प्रतिबंधात्मक कामांमध्ये व्यस्त होते. त्यात मालमत्ताकर विभागाच्याही अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता. आगामी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोव्हीडची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका असल्याने पुन्हा कोव्हीड विषयक कामांमध्ये सर्व व्यस्त होतील. त्यामुळे जून आणि जुलै महिन्यात मालमत्ताकर वसूलीवर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

यादृष्टीने थकबाकीदार करदात्याने नेमक्या कोणत्या कारणामुळे कर थकीत ठेवला आहे हे समजून घेणे गरजेचे आहे असल्याचे सांगत आयुक्तांनी यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे मालमत्तेचे जे करनिर्धारण केलेले असते त्याबाबत हरकती असतात. जर त्या हरकती विनाविलंब, कालबध्द व पारदर्शक रितीने निकाली काढल्या नाहीत तर करदात्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होते. हे टाळण्यासाठी विभागाने याबाबत पुढाकाराची भूमिका घेणे गरजेचे आहे तसेच करदात्यांमध्ये विश्वस निर्माण होईल यादृष्टीने काम करणे गरजेचे आहे असे सांगितले. या व्यतिरिक्त जर कोणी करदाता कोणत्याही सयुक्तिक कारणाशिवाय कर प्रलंबित ठेवत असेल तर कोणत्याही प्रकारे सहानुभूतीची भूमिका न ठेवता कारवाई करणे आवश्यक आहे. Tax payment is Non Negotiable याची सर्व थकबाकीदारांना जाणीव होणे गरजेचे आहे हे विभागाने लक्षात ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले.

यापुढील काळात दर 15 दिवसांनी मालमत्ता कर विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर वसूलीला गती द्यावी असे निर्देश यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button