दिव्यांगांचे रांग न लावता केंद्रांवर होणार थेट लसीकरण
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केली जात असताना 31 जुलैपर्यंत 45 वर्षावरील सर्व नागरिकांना किमान पहिला डोस दिला जावा हे लक्ष्य महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नजरेसमोर ठेवले आहे व त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
सध्या कोव्हीड लसीचा पुरवठा काहीसा कमी प्रमाणत होत असला तरी महानगरपालिकेने कोव्हीड 19 लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढले असून त्याबाबतचा पाठपुरावा सातत्याने सुरु आहे. हे करताना महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या लसींचे दैनंदिन नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले जात असून महापालिका क्षेत्रातील सर्व विभागातील नागरिकांना आपल्या नजीकच्या केंद्रावर लसीकरण उपलब्ध होईल याची काळजी घेतली जात आहे.
यामध्ये शारीरिक अडचणींमुळे लसीकरणासाठी केंद्रावर जाऊन टोकन क्रमांकासाठी रांग लावणे शक्य नसलेल्या दिव्यांगांच्या अडचणींचा विचार करून महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर दिव्यांगांना रांग न लावता थेट लसीकरण करण्याबाबतचे आदेश आयुक्तांनी निर्गमित केले आहेत. यामुळे 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना विनात्रास सुलभपणे लसीकरण करून घेणे शक्य होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 2 लक्ष 70 हजार 288 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यामधील 95 हजार 394 नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत एकूण 3 लक्ष 65 हजार लसींचे डोस देण्यात आलेले आहेत.
लसीकरणामध्ये नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यात येत असून उद्या होणा-या लसीकऱणाची संपूर्ण माहिती दररोज संध्याकाळी सोशल मिडीयाव्दारे प्रसारित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रांवरही उन्हाळी / पावसाळी शेड, खुर्च्या, पंखे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.