कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून 2.5 कोटीहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल
– कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून 2.5 कोटीहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल
– विशेष दक्षता पथकांनी 19 मार्चपासून 95 लाखाहून अधिक केली दंडात्मक वसूली
कोव्हीडच्या दुस-या लाटेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांच्या दैनंदिन संख्येत मागील 2 आठवड्यांपासून काहीशी घट होताना दिसत असली तरी कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून कोरोना बाधीतांची संख्या वाढू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका दक्ष आहे. त्या अनुषंगाने कन्टेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश दैनंदिन वेब संवादाव्दारे होणा-या कोव्हीड आढावा बैठकीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व विभाग कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना दिलेले असून त्यासोबतच 1 जून पर्यंत लागू असलेल्या संचारबंदीच्या नियमांचेही नागरिकांकडून पालन केले जाईल याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करण्यात आलेले आहे.
संचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी 7 ते 11 या कालावधीत परवानगी देण्यात आलेली असून त्यानंतर दुकाने उघडी राहणार नाहीत याबाबत विशेष दक्षता घेण्यात येत आहे. त्यासोबतच दुकाने खुली असलेल्या सकाळी 11 वाजेपर्यंतच्या वेळेत जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होणार नाही आणि घराबाहेर आलेले नागरिक मास्क, सुरक्षित अंतर या नियमांचे पालन करतील याकडेही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मॉर्निंग वॉक अथवा इव्हिनिंग वॉकला संचारबंदीच्या कालावधीत प्रतिबंध असून त्यासाठी घराबाहेर पडणा-या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे तसेच त्यांची ॲन्टिजन टेस्टही करण्यात येत आहे.
संचारबंदी सुरु झाल्यापासून 23 मे पर्यंत महानगरपालिकेची 31 विशेष दक्षता पथके तसेच विभाग कार्यालय स्तरावरील 8 पथके यांनी पोलीस विभागाच्या सहकार्याने संचारबंदीच्या तसेच कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या 15863 नागरिक / दुकानदार यांच्या कडून रु. 69 लक्ष 1 हजार 100 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये विशेष दक्षता पथकांनी 12416 नागरिक / दुकानदार यांच्याकडून 53 लक्ष 66 हजार 700 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली असून, एपीएमसी मार्केटमधील दक्षता पथकांनी 3187 नागरिक / दुकानदार यांच्याकडून 9 लक्ष 37 हजार 900 इतक्या रक्कमेचा दंड वसूल केलेला आहे.
या कालावधीत विभाग कार्यालय स्तरावरील विभागीय दक्षता पथकांनी 3447 नागरिक / दुकानदार यांच्याकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यापोटी 15 लक्ष 35 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
शासन निर्देशानुसार कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी 15 एप्रिल पासून 1 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली असून संचारबंदीचे नागरिकांनी पालन केल्यामुळेच कोरोना बाधीतांच्या संख्येत काही प्रमाणात घट होताना दिसून येत आहे. तथापि काही बेजबाबदार नागरिकांमुळे याच्या उलट चित्र निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिका दक्ष असून पोलीस विभागाच्या सहकार्याने कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांना समज मिळावी म्हणून दंडात्मक कारवाई करीत आहे. एप्रिल 2020 पासून आत्तापर्यंत 54489 नागरिक / व्यावसायिक यांच्यावर कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करीत 2 कोटी 50 लक्ष 7 हजार 606 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.