नवी मुंबई

“युगनिर्माते प्रतिष्ठानच्या भावनिक आवाहनाला साद घालत सोशल मीडियाच्या माध्यमातून उभी राहिली ₹ ५२००० ची मदत”

नवी मुंबई: सध्या सोशल मीडियाचा वापर म्हणलं की सगळीकडे नकारात्मक चर्चाच सुरु होतात. परंतु सोशल मिडियाचा सकारात्मक आणि समाज हितासाठी उपयोग कसा केला जाऊ शकतो याची फार कमी चर्चा होत असते. परंतु नवी मुंबईतील युगनिर्माते प्रतिष्ठानने कोपरी गाव भागातील बोत दांम्पत्याच्या नवजात बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी कुटूंबियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तासांमध्ये तब्बल ५२००० रुपये एवढी आर्थिक मदत सुपूर्द करत नवजात बाळाला जीवनदान देऊन समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला मेकॉनियनने ग्रासलं होतं. जन्म घेताच पूर्ण विकास न झाल्याने त्या बाळाला मलविसर्जनाच्या समस्या उदभावू लागल्या. यातच बाळाचे पोट फुगू लागले, बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि बाळ आईपासून दुरावले गेले. अश्या परिस्थितीत डॉक्टरांनी बाळावर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात येणार होता. या नवजात बाळाच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शस्त्रक्रिये साठी लागणारे इतके पैसे उभे करायचे तरी कसे? बाळाला वाचवायचे तरी कसे? अशा मोठ्या आर्थिक व मानसिक विवंचनेत बाळाचे कुटूंबीय पडले.

अश्यातच या प्रकरणाची माहिती कोपरी गाव येथे वास्तव्यास असलेल्या युगनिर्माते प्रतिष्ठानचे सरचिटणीस सौरभ आहेर यांना १० मे रोजी समजली. लागलीच युगनिर्माते प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर वसमाने यांच्या सोबत मध्यरात्रीच या प्रकरणाची चर्चा करून कुटूंबियांना बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याचे ठरले. उपाध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी युगनिर्माते प्रतिष्ठानची यंत्रणा मध्यरात्री पासूनच सक्रिय करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला असंख्य लोकांनी मदतीचा हातभार दिला. मित्र मंडळी,अनोळखी व्यक्ती, किल्ले बेलापूर कृती समिती, खारघर युवा विचार मंच, बांधिलकी प्रतिष्ठान, श्री प्रतिष्ठान, अमोल पाटील युवा विचार मंच यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नवजात बाळाचे प्राण वाचावे यासाठी आर्थिक मदत केली. शेवटी काय तर “शुद्ध अंतकरणाने एखादे सामजिक कार्य करायचे ठरवले आणि आपल्या जवळील साधनांचा सुयोग्य व सकारात्मक उपयोग केला तर आपण अद्वितीय असे कार्य नक्कीच करू शकतो”

“आपल्या देशातील युवा शक्तीने जर समाज माध्यमांचा (सोशल मीडियाचा) सुयोग्य आणि समाजहितकारी वापर केला तर देशाच्या विकासातील हा एक महत्वाचा बिंदू असेल” असे मत युगनिर्माते प्रतिष्ठानचे संस्थापक शंकर वसमाने यांनी व्यक्त केले.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button