नवी मुंबई

संचारबंदीचे उल्लंघन करून आगाऊ दंड भरण्यास तयार असलेल्या बेजबाबदार व्यक्तीचा माफीनामा

कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ब्रेक द चेन आदेशानुसार 31 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या कालावधीत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणारे असून त्यावर महानगरपालिका आणि पोलीस विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये सकाळी व संध्याकाळी मॉर्निंग अथवा इव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाईप्रमाणेच गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अशा वॉकच्या ठरावीक ठिकाणांवर ॲन्टिजन टेस्टही करण्यात आलेल्या आहेत.

संचारबंदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन हे दंडनीय आहे. यावर महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांमार्फत लक्ष ठेवले जात आहे. पामबीच मार्गालगत सर्व्हीस रोडवर मॉर्निंग वॉक करणा-या एका व्यक्तीकडून नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पथकाने दंड आकारला असता सदर व्यक्तीने पुढील 5 दिवसाचीही दंडात्मक रक्कम भरतो, मात्र मॉर्निंग वॉकला येणार असे सांगितले. अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करून त्याबाबतचे गांभीर्य नसणा-या बेलापूर विभागातील एका बेजबाबदार नागरिकाविरूध्द महानगरपालिका आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली आहे. या व्यक्तीस एन.आर.आय. पोलीस ठाण्यामध्ये नेऊन त्यांना या कृत्यामुळे सार्वजनिक आरोग्याला बाधा पोहचत असल्याची जाणीव करून देण्यात आली. यावर सदर व्यक्तीने लेखी माफीनामा लिहून दिला आहे. या व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आलेली आहे.

मागील काही दिवसांपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांची संख्या कमी होताना दिसत असली तरी ही संख्या पुन्हा वाढू नये याकरिता सर्वोतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने कोरोनाची साखळी पूर्णपणे खंडीत करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. त्यामुळे जीवनावश्यक बाबींशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये व अत्यावश्यक कामांकरीता घराबाहेर पडल्यास मास्क, सुरक्षित अंतर व सतत हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button