ऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन
– ‘माझी सोसायटी माझी जबाबदारी’ उपक्रम राबवण्यासाठी पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौघुले यांचा पुढाकार
– कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा पालकमंत्री शिंदे यांच्याहस्ते विशेष सन्मान
ऐरोली:
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ यानंतर ‘माझी सोसायटी माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवण्यासाठी पुढाकार घेणे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे काढले. नवी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौघुले यांनी पुढाकार घेऊन यश पॅरडाइज इमारतीत सुरू केलेल्या २६ बेड्सच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण सारे कोरोना संपला, असे समजून निर्धास्त झालो होतो; मात्र कोरोनाची दुसरी लाट आली आणि आपल्याला आपल्या मर्यादा लक्षात आणून दिल्या. त्यामुळेच गाफिल न राहाता आपण आपली तयारी चोख करायला हवी आणि त्यादृष्टीने सोसायटीच्या आवारात कोविड केंद्र सुरू करण्याची ही कल्पना उत्तम आहे. यामुळे मोठ्या सोसायटीमधील नागरिकांना सोसायटीच्या आवारातच उत्तम वैद्यकीय सुविधा देता येतील आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे श्री शिंदे यांनी सांगितलं.
कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त धोकादायक आहे, मात्र ही लाट येऊ नये यासाठी सतर्क राहण्याची आणि वेळीच लस घेण्याची गरज श्री. शिंदे यांनी व्यक्त केली. त्यासोबतच म्युकरमायकोसिस सारखे गंभीर आजार होऊ नयेत, यासाठी देखील जास्त दक्ष राहाण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यश पॅरडाइज सोसायटीच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरू करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये एकावेळी २६ रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. यात १५ ऑक्सिजन बेड्स आणि पाच आयसीयू बेडसचा समावेश आहे. सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम सुरू केला असल्याचे श्री. चौघुले यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऐरोली मधील नागरिकांची नि:स्वार्थपणे सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी श्री. शिंदे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी पालकमंत्री श्री. शिंदे यांच्यासह ठाण्याचे खासदार राजन विचारे, राज्यस्तरीय कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित, नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.