‘महावितरण विभागाचा’ भोंगळ कारभार: माजी आमदार संदीपजी नाईक ह्यांनी घणसोली येथील एमएसईडीसी उपकेंद्राला दिली भेट
७२ तास उलटून गेले तरी काही भागात विद्युत पुरवठा चालू झालेला नाही. नागरिकांचा कॉल घेण्यासाठी किंवा वीजपुरवठा पुनर्संचयित करण्याच्या स्थितीबद्दल नागरिकांना अद्ययावत ठेवण्यासाठी महावितरणचा कोणताही अधिकारी उपलब्ध नाही; यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये संताप व अशांतता निर्माण झाली आहे. राज्य शासनाने चालविलेल्या एमएसईडीसीने कोविडच्या काळात अखंडित वीज पुरविली नाही तर आपण त्याचा तीव्र निषेध करू असा इशारा माजी आमदार संदीपजी नाईक ह्यांनी दिला.
तोक्ते चक्रीवादळामुळे खूप मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या पूर्व सूचना मिळून सुद्धा आपले प्रशासन किती हतबल आहे हे दिसून आले. सोमवारी दुपारी नवी मुंबई परिसराला तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. सकाळपासून जोरात वारे वाहत होते. वाशी, सेक्टर १५ मध्ये ९.४५ च्या सुमारास वीज गायब झाली आणि सुमारे ११.३० वाजता आली. या दीड तासाच्या कालावधीमध्ये अक्षरशः लोकं वैतागली होती. बाहेर लॉकडाउन आहे त्यात घरी वीज नाही. वीज आणि पाणी जीवनावश्यक गरजा आहेत. त्यामुळे त्या २४ तास आपणास मिळाल्या पाहिजेत.
वाशी मध्ये दीड तास वीजपुरवठा नव्हता तर लोकांची मनस्थिती खूप हाताबाहेर गेली होती. तर घणसोली गाव, गोठवली, कोपरखैरणे ह्या सारख्या ठिकाणी अजून विजेचा लपंडाव सुरु आहे, काही ठिकाणी अद्याप वीज आली सुद्धा नाही. दोन दिवस उलटून सुद्धा प्रशासन कासवाप्रमाणे काम करताना दिसत आहे. महावितरण ऑफिस मध्ये कॉल केला तर फोन कोण उचलत नाही आणि उचलला तर नेमके उत्तर मिळत नाही. फोन वर सांगितले जाते कि येईल एका तासाने, येईल चार तासाने अशी उत्तरे मिळतात.
घणसोली गावातील राजश्री कांबळे सांगतात कि, “सोमवारी सकाळी ५ वाजता लाईट गेली आहे. लाईट येते जाते, दोन दिवस होऊन गेले अजूनहि वीजपुरवठा आलेला नाही. पाण्याच्या वेळेवर लाईट जाते, पिण्याचे पाणी पण मिळत नाही अशी अवस्था झाली आहे.” आपण कुठे खेडेगावात नाही राहत, कि तीन दिवस लागतात परिस्थिती पूर्वपदावर येण्यास. लोकांना वर्क फ्रॉम होम आहे तसेच ऑनलाईन क्लासेस आहेत.कसे जगायचे?”
नवी मुंबई वार्ताशी बोलताना जनसंपर्क अधिकारी (महावितरण कार्यालय, भांडुप सर्कल) ममता पांडेनी सांगितले कि आज बहुतेक सर्व ठिकाणी दुपारपर्यंत वीजपुरवठा पूर्वपदावर आलेला आहे.