18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी ऑनलाईन अपॉईमेंट बुकींग दररोज सायं. 5 वाजता, तसेच 2 लाख 31 हजाराहून अधिक नागरिकांचे कोव्हीड लसीकरण पूर्ण
शासन निर्देशानुसार 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हीड लसीकरणास सुरुवात झाली असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1 केंद्र कार्यान्वित आहे. नेरुळ सेक्टर 15 येथील महानगरपालिकेच्या मॉँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात पहिल्या मजल्यावर 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी विशेष बुथ सुरु असून 3 दिवसात 826 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
या लसीकरणासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी https://selfregistration.cowin.gov.in या कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी करावयाची असून नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर आपल्या सोयीचे लसीकरण केंद्र निवडून त्याठिकाणी आपली अपॉईंटमेंट आरक्षीत करावयाची आहे. या लसीकरणासाठी दररोज संध्याकाळी 5 वाजता लसीकरण सेशन प्रसिध्द होत असून मागील 2 दिवसांचा अनुभव बघता काही मिनिटातच या पोर्टलवर सर्व अपॉईंटमेंट निश्चित होत आहेत. त्यामुळे संध्याकाळी 5 वाजता सेशन प्रसिध्द झाल्यावर त्वरीत बुकींग करण्याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. या बुथवर दररोज 200 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असून तेवढ्याच अपॉईंटमेंट पोर्टलवर निश्चित केल्या जात आहेत. सध्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शासन मान्यतेनुसार 18 ते 44 वयोगटासाठी एकच केंद्र सुरु असून याठिकाणी अपॉईंटमेंट निश्चित झालेल्या नागरिकांनीच येऊन लसीकरण करावयाचे आहे व केंद्रावर होणारी अनावश्यक गर्दी टाळावयाची आहे असे आवाहन करण्यात येत आहे.
सद्यस्थितीतील लसीचा कमी पुरवठा लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वतीने दररोज संध्याकाळी कोणत्या केंद्रावर, कोणती लस उपलब्ध असणार आहे याबाबतची माहिती सोशल मिडीयाव्दारे व्यापक स्वरुपात प्रसिध्दी करण्यात येत असून नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे.
लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांचे कोव्हीड लसीकरण व्हावे यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दैनंदिन वैद्यकीय अधिकारी व विभाग अधिकारी यांच्या आढावा बैठकीत केंद्र वाढीबाबत निर्देश दिले असून 45 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे 31 जुलैपर्यंत कमीत कमीत लसीचा 1 डोस पूर्ण होईल अशाप्रकारे नियोजन करण्यात येत आहे. सध्या महानगरपालिकेचे रुग्णालये / नागरी आरोग्य केंद्रे अशा 28 ठिकाणी तसेच 14 खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत.
या केंद्रांमध्ये वाढ करतानाच असलेल्या लसीकरण केंद्रांठिकाणी सध्याचा मे महिन्याचा उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता व आगामी पावसाळ्याचा अंदाज घेऊन सर्व लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप घालणे तसेच खुर्च्या आणि पंख्याची व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये यादृष्टीने उपस्थितीचा अंदाज घेऊन टोकन क्रमांक दिले जावेत व नागरिकांचा साधारणत: लसीकरणासाठी क्रमांक कधी येईल याची कल्पना नागरिकांना द्यावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी फिरते लसीकरण केंद्र असावे याचेही नियोजन केले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 2 लक्ष 31 हजार 170 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यामधील 67 हजार 805 नागरिकांनी लसीचा दुसराही डोस घेतला आहे. म्हणजेच एकूण 2 लक्ष 98 हजार 975 लसीचे डोस देण्यात आलेले आहेत. कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन यापैकी ज्या लसीचा पहिला डोस घेतला त्याच लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे असल्याने याही बाबीकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रांवर दोन्ही लसींच्या नोंदणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.