देश

10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला देशातील प्रथम क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर म्हणून बहुमान प्राप्त

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

-‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबई देशातील प्रथम क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहरला (1st Rank as India’s “Cleanest Big City”)
-महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई नेहमीप्रमाणेच नंबर वन
-‘सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज’ अभियानात नवी मुंबईला देशात व्दितीय क्रमांकाचे मानांकन
-कचरामुक्त शहराचे ‘फाईव्ह स्टार’ मानांकन व ओडीएफ कॅटेगरीमध्ये ‘वॉटरप्लस’ मानांकन मिळविणारे नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर

“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2021” मध्ये नवी मुंबई शहरास 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराचा (1st Rank as India’s Cleanest Big City) बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच नवी मुंबई नंबर वनचे स्वच्छ शहर आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ विशेष समारंभात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी हा सन्मान केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री ना. श्री. हरदीपसिंह पुरी यांच्या शुभहस्ते, केंद्रीय सचिव श्री.दुर्गाशंकर मिश्रा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्विकारला.

नवी मुंबई महानगरपालिकेस या विशेष समारंभात आणखी तीन महत्वाचे सन्मान प्राप्त झाले असून स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ‘सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज’ अभियानात नवी मुंबई देशातील व्दितीय क्रमांकाचे मानांकीत शहर ठरले आहे. तसेच ‘कचरामुक्त शहरांमध्ये’ नवी मुंबई महानगरपालिकेने आपले ‘फाईव्ह स्टार मानांकन’ कायम राखले आहे. त्याचप्रमाणे ओडीएफ कॅटेगरीमध्ये नवी मुंबई शहरास ‘वॉटर प्लस’ या सर्वोच्च मानांकनाने सन्मानीत करण्यात आले.

या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ भारत मिशन कक्ष विभागांचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. अमरीश पटनिगेरे उपस्थित होते.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये देशभरातील 4320 शहरे सहभागी झाली होती. यामध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराच्या (India’s Cleanest Big City) पुरस्काराने नवी मुंबई महानगरपालिकेस गौरविण्यात आले.

‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त करणा-या देशातील 9 शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील ‘फाईव्ह स्टार मानांकन’ प्राप्त एकमेव शहर आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील (ओडीएफ) ‘वॉटरप्लस’ हे सर्वोच्च मानांकन मिळविणा-या देशातील 9 शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.

शहर स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक असलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी सक्रीय सहभाग घेत केलेल्या स्वच्छता कार्याचे फलित म्हणजे हे राष्ट्रीय सन्मान असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी हे पुरस्कार स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित केले आहेत.

यावर्षी ‘स्वच्छ सर्वंक्षण 2021’ मध्ये जुलै ते ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंबर तसेच डिसेंबर ते फेब्रुवारी या तिमाही कालावधीच्या 3 सत्रांत कागदपत्रे तपासणी तसेच नागरिकांचे अभिप्राय या पध्दतीने परीक्षण करण्यात आले. याशिवाय अखेरच्या परीक्षणात केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांव्दारे पूर्वकल्पना न देता महानगरपालिका क्षेत्रातील स्थळांची 3 वेळा प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ही पाहणी करताना परीक्षण समिती सदस्यांकडून कोणत्याही नागरिकाशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्वच्छता ॲप, दूरध्वनी यावरूनही कोणत्याही नागरिकास दूरध्वनी करून त्याच्या शहर स्वच्छता विषयक प्रतिक्रियांची नोंद घेण्यात आली होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदाने व स्वच्छता मित्रांनी केलेले स्वच्छताविषयक काम आणि त्याला नागरिकांचा लाभलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छतेचा हा बहुमान प्राप्त झालेला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होत यावर्षी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सौंदर्यीकरणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आल्या. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण-संवर्धनाचे संदेश प्रसारित करणाऱ्या आकर्षक रंगचित्रांनी सजलेली भिंतीचित्रे, महत्त्वाच्या चौकातील लक्षवेधी शिल्पाकृती, विद्युत दिपांनी उजळलेले उड्डाणपुल, अंडरपास व विद्युत खांब, स्वच्छ तलाव काठांवर विलोभनीय चित्रे अशा विविध प्रकारे नवी मुंबई शहर लक्षवेधी स्वरुपात सजले. जे.जे. स्कुल ऑफ आर्टस् च्या कल्पक विद्यार्थी कलाकारांनी आगळ्यावेगळ्या कल्पना राबविल्या आणि येथील मूळ आगरी-कोळी संस्कृतीपासून अत्याधुनिक प्रगतीपर्यंतचे विविध कलाप्रकार ठिकठिकाणी दृश्य स्वरुपात साकारत शहराचे रूपच पालटले. या बदललेल्या रुपाची नोंद येथील नागरिकांपासून शहराला भेटी देणाऱ्या पर्यटकांपर्यत सर्वांनीच घेतली.

त्याचप्रमाणे यावर्षी स्वच्छतेच्या अंगाने विशेष लक्षवेधी ठरलेली बाब म्हणजे मोठ्या नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊन ते अस्वच्छ होऊ नयेत याकरिता त्यांच्या काठांवर बसविण्यात आलेल्या विशिष्ट प्रकारच्या उंच जाळ्या तसेच नाल्यांच्या प्रवाहात कचरा असल्यास तो वाहून न जाता एके ठिकाणी अडकून साफ करता यावा याकरिता नाल्यांच्या प्रवाहात लावण्यात आलेल्या नेट या दोन महत्वाच्या उपाययोजनांमुळे नाले स्वच्छ रहात असून याचीही दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. याशिवाय नवी मुंबई शहरात मोठ्या संख्येने तलाव असून त्यांचा जलाशय नेहमीच स्वच्छ रहावा याकडेही काटेकोर लक्ष दिले जात आहे.

महापालिका क्षेत्रात घरात निर्माण होणा-या कच-याचे घरातच वर्गीकरण करून तो कचरा गाड्यांमध्येही वेगवेगळा देण्यात येतो. कचरा वाहतुकीसाठी अत्याधुनिक आर.एफ.आय.डी. तंत्रप्रणाली राबविण्यात येत असल्याने कचरा संकलनाप्रमाणेच योग्य पध्दतीने कचरा वाहतुकीतही नवी मुंबई नेहमीच आघाडीवर राहिली आहे.

कोरोना प्रभावित कालावधीतही शहर स्वच्छतेकडे जराही दुर्लक्ष होऊ न देता कोरोनाग्रस्त विलगीकरणात असलेल्या घरांतील कचरा कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करीत संकलित करून त्याची विल्हेवाटही त्याच सुरक्षित पध्दतीने लावण्याकडे नवी मुंबई महानगरपालिका विशेष लक्ष देत आहे.

तुर्भे एम.आय.डी.सी. येथील शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी खत व प्लास्टिक ग्रॅन्युल्स तसेच फ्युएल पॅलेटस् निर्मिती प्रक्रिया केली जात असून त्यामध्ये बांधकाम, पाडकाम कचरा अर्थात डेब्रिजच्या सुयोग्य विल्हवाटीसाठी सी अँड डी वेस्ट प्लान्ट कार्यान्वित करण्यात आलेला आहे.

दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणा-या शहरातील अनेक सोसायट्या, उद्योग, हॉटेल्स, उद्योग समूह यांनी आपल्या आवारातच ओल्या कच-यापासून खत प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा तसेच उद्यानांमध्येही खत प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. 5 झोपडपट्ट्यांमध्ये यशस्वीपणे ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ यशस्वीरित्या राबविण्यात येत असून इतरही सर्व झोपडपट्ट्यांमध्ये तसेच सेक्टर भागातही शून्य कचरा प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 2 ठिकाणी प्रायोगिक स्वरूपात बसविण्यात आलेल्या भूमीगत यांत्रिकी कचराकुंड्याना मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता त्यामध्येही वाढ करण्यात येत आहे.

जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त रितीने बंद करून त्याठिकाणी फुलविण्यात आलेल्या निसर्गोद्यानात ‘स्वच्छता पार्क’ ही अभिनव संकल्पना साकरलेली असून स्वच्छतेचे संस्कार करण्यामध्ये ती लाभदायी ठरलेली आहे. शहरातील दैनंदिन साफसफाई विहीत वेळेत व योग्य रितीने केली जात असल्याचे निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी राबविलेली ‘स्मार्ट वॉच’ संकल्पना उपयोगी सिध्द झालेली आहे.

शौचालय व्यवस्थापनामध्ये शौचालयांच्या नियमित स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष दिले जात असून शहरातील 406 सार्वजनिक व सामुदायिक शौचालये गुगल मॅपवर सहजपणे उपलब्ध आहेत. शौचालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून 21 ई टॉयलेटपैकी विशेष सुविधांसह महिलांकरिता स्वतंत्र SHE टॉयलेटही कार्यरत आहेत. दिव्यांग व लहान मुले यांच्याकरिताही शौचालयांमध्ये विशिष्ट प्रकारच्या शौचकुपांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक शौचालयाच्या ठिकाणी तेथील स्वच्छता व अनुषांगिक बाबींवर नागरिकांना अभिप्राय देण्यासाठी क्यू आर कोड प्रणालीची व्यवस्था करण्यात आलेली असून अभिप्रायांची दखल घेतली जात आहे. स्वच्छतेविषयीच्या तक्रारी नोंदविण्यासाठी विशेष तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित असून प्राप्त तक्रारींचे 24 तासात निराकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शौचालयांमध्ये पायाने वापर करावयाचे सोप डिस्पेन्सर ठेवण्यात आले असून शौचालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

“स्वच्छ सर्वेक्षण 2021” मध्ये लोकसहभागावर भर देण्याच्या दृष्टीने कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करीत विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांच्याप्रमाणेच लोकप्रतिनिधी व नागरिकांचीही मोठया प्रमाणात सक्रीय सहभाग लाभला. त्यामुळे शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली.

यामध्ये विशेषत्वाने स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रॅड अँम्बेसेडर आणि जागतिक किर्तीचे गायक, संगीतकार श्री. शंकर महादेवन यांच्या संगीतमय सहभागाने सजलेला ’21 डेज चॅलेंज’ हा अभिनव उपक्रम अत्यंत लोकप्रिय झाला. केंद्रीय सचिव श्री. दुर्गाशंकर मिश्रा यांनी चॅलेंजच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ऑनलाईन सहभागी होत या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले.* याशिवाय स्वच्छ सोसायटी – रुग्णालय – शाळा महाविद्यालय – हॉटेल्स अशा स्पर्धा, स्वच्छता मोहिमा अशा विविध कार्यक्रमांमध्ये नवी मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने सक्रीय सहभाग झाले व सर्वांनी मिळून शहरात स्वच्छतेचा जागर केला.

सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने राबविण्यात येणा-या कच-यात टाकली जाणारी जुनी पादत्राणे संकलित करून व दुरूस्त करून पुनर्वापरात आणण्याच्या ‘ग्रीन सोल’ या अभिनव संकल्पनेला उत्तम प्रतिसाद लाभला. ‘प्लास्टिमॅन’ ही सॅशे, चॉकलेट रॅपर्स, पिशव्यांचे कापले जाणारे तुकडे अशा तुकड्यांच्या स्वरूपातील प्लास्टिक बाटल्यांमध्ये संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या मोहीमेचीही प्रशंसा झाली.

अशाप्रकारे विविध स्वरुपातील स्वच्छता विषयक केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांचे फलित म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशातील 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या सर्वोत्तम स्वच्छ शहराचा (India’s Cleanest Big City) पुरस्कार, राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर तसेच सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात देशात व्दितीय क्रमांकाचे शहर आणि कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग व ओडीएफ कॅटेगरीत वॉटरप्लस हे सर्वोत्तम मानांकन असे विविध बहुमान प्राप्त झाले असून हा प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाचा सन्मान असल्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी म्हटले आहे.

यामध्ये महापालिका अधिकारी-कर्मचारी, विशेषत्वाने सफाई कामगार आणि स्वच्छतेविषयी जागरूक लोकप्रतिनिधी, विविध संस्था-मंडळे तसेच विविध वयोगटातील नागरिक अशा सर्वच घटकांनी आपले अनमोल योगदान दिलेले आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार व अभिनंदन करीत स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने यापुढील काळात ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला सामोरे जाताना आपले राष्ट्रीय मानांकन उंचाविण्यासाठी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हा आपला ध्यास प्रत्यक्षात आणण्याकरिता रस्ते दत्तक योजना, शून्य कचरा झोपडपट्टी, गांवठाण व सेक्टर संकल्पना तसेच पेट कॉर्नर व असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वांनी मिळून अधिक जोमाने काम करूया असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button