नवी मुंबई

पुन्हा’मिशन ब्रेक द चेन’ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता

महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे विशेष बैठकीत निर्देश

* मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत असून या कोरोनाच्या  संभाव्य दुस-या लाटेचा वेग ब-याच अंशी जास्त आहे. त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात आहे.

* आज महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीड 19 शी संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेत कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मुद्देनिहाय सविस्तर चर्चा केली व आदेश निर्गमित केले.

* सध्या कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ‘मिशन ब्रेक द चेन’ ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ट्रेस, टेस्ट आणि ट्रिटमेट या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीवर अधिक भर देण्याचे सूचित करीत आयुक्तांनी टेस्टींग वाढीसाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रात कोव्हीड टेस्टींग सेंटर तसेच फ्ल्यू ओपीडी सुरू करण्याचे निर्देशित केले.

* त्याचप्रमाणे 5 पेक्षा जास्त रूग्ण आढळतात अशा सोसायट्या व त्याच्या आसपासच्या सोसायट्यांमध्ये तसेच मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळताहेत अशा वसाहतींमध्ये टेस्टींग करण्यासाठी ‘कोव्हीड टेस्टींग मोबाईल व्हॅन’ पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

* टेस्टींग प्रमाणेच सध्याची वाढती रूग्णसंख्या विचारात घेता रूग्ण उपचारासाठी सध्या उपलब्ध असलेल्या 1200 बेड्स क्षमतेच्या सिडको एक्झिबिशन सेंटर व्यतिरिक्त साधारणत: 800 ते 1000 बेड्स उपलब्ध होतील अशाप्रकारे तात्पुरती बंद केलेली कोव्हीड केअर सेंटर्स पुन्हा सुरू करण्याविषयी त्वरित कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

* त्यामध्ये प्रत्येक परिमंडळात 1 अशाप्रकारे महिलांसाठी राखीव दोन कोव्हीड केअर सेंटर्स सुरू करावीत तसेच करोनाबाधित गरोदर महिला व प्रसूती झालेल्या माता यांच्याकरिता कार्यान्वित बेलापूर येथील माता बाल रूग्णालयामध्ये बेड्सची संख्या वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

* कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना कोव्हीड लसीकरणाचेही प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत सध्या महापालिका रूग्णालयात ज्याप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस लसीकरण होते त्याचप्रणाणे नागरी आरोग्य केंद्रातील लसीकरणही 5 दिवसाऐवजी रविवारसह सातही दिवस ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले.

* महानगरपालिकेमार्फत होणारे कोव्हीड टेस्टींग आणि लसीकरण सध्याची कोव्हीड प्रभावित स्थिती लक्षात घेता कोणतीही सुट्टी न घेता आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवण्याचे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.

* महानगरपालिकेच्या स्वत:च्या आरटी-पीसीआर लॅबमधून दररोज 2 हजार इतक्या आरटी – पीसीआर टेस्ट्सचे रिपोर्ट प्राप्त होत आहेत. आता टेस्टींगची संख्या अधिक वाढवून सीएसआरच्या माध्यमातून खाजगी मान्यताप्राप्त लॅबमार्फत टेस्ट्स रिपोर्ट उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले.

* रूग्णसेवेची उपलब्धता वाढविण्याप्रमाणेच रूग्णवाहिकांचे नियोजन, रूग्णालयातील बेड्स उपलब्धतेचा डॅशबोर्ड अद्ययावतीकरण, गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठीच्या उपाययोजना, कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष दक्षता पथकांची कार्यवाही अशा विविध बाबींबाबत या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली.

कोव्हीड विषयक सर्व सुविधा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करणेबाबातची कार्यवाही तसेच इतर अनुषांगिक बाबींची पूर्तता तत्परतेने करण्याचे आरोग्य विभागास आदेशित करतानाच आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईकर नागरिकांनीही कोरोना विषाणूपासून स्वत:चा व संपर्कातील इतरांचा बचाव करण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात धुणे वा सॅनिटायझर वापरणे या सुरक्षा त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button